Thergaon News: गढूळ पाणीपुरवठा होऊ देऊ नका- महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – नगरसेवकांच्या समस्या आठ दिवसांत सोडवाव्यात. सर्व कामे वेळेवर करावीत. अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करून सदस्यांना वेळोवेळी अवगत करावे. पाणीप्रश्नाबाबत पाण्याचा दाब व्यवस्थित राहील याकडे लक्ष द्यावे. नळातून होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्याबाबत कारणे शोधून योग्य ती उपाययोजना करावी अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

थेरगाव येथील ग क्षेत्रिय कार्यालय येथे महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग अध्यक्ष, नगरसदस्य, नगरसदस्या तसेच स्थापत्य, विद्युत,पाणीपुरवठा, आरोग्य, वैद्यकीय, उद्यान आणि प्रशासन अधिकाऱ्यांसमवेत क्षेत्रिय कार्यालयांतर्गत समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आदेश दिले.

या बैठकीस प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, क्षेत्रिय अधिकारी श्रीनिवास दांगट, नगरसदस्य संदीप वाघेरे, चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, अ‍ॅड. सचिन भोसले, विनोद तापकीर, संदीप गाडे, गोपाळ मळेकर, नगरसदस्य झामाबाई बारणे, सविता खुळे, सुनिता तापकीर, ज्येष्ठ वैदयकीय अधिकारी डॉ. संगिता तिरूमणी, डॉ.अभयचंद्र दादेवार, संबंधित अधिकारी, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नगरसदस्यांनी विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने स्थापत्याची कामे संथगतीने सुरु आहेत. राडारोडा उचलला जात नाही. विद्युतचे जुने डीपी बदलणे, अतिक्रमणे वाढली आहेत याबाबतीत कार्यवाही होत नाही. डासांचे प्रमाण वाढले आहे. फवारणी करणे आवश्यक आहे. रस्त्यांवर झाडांच्या फांद्यांमुळे अडथळा निर्माण होतो. पाणी गढूळ आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कामांसाठी तरतूद कमी आहे. लसीकरण अपुरे आहे. लसीकरणाचे नियोजन व्यवस्थित नाही. पावसामुळे ड्रेनेज तुंबून पाणी येते. कनिष्ठ अभियंते बैठकीस उपस्थित राहत नाहीत. अधिका-यांमध्ये ताळमेळ दिसत नाही. नदीमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. करसंकलन विभागाकडे 3-3 महिने फाइल्स प्रलंबित आहेत. वाकड रस्त्याचे काम अपूर्ण आहे. घरोघरी औषधांची फवारणी करणेत यावी. महापालिकेने डांगे चौक ते ताथवडे येथील गाळेभाडे वाढविले आहे. सध्या कोरोनामुळे व्यवसाय कमी झाले ते कमी करण्यात यावे, आदी समस्याचा समावेश होता.

बैठकीचे प्रास्ताविक क्षेत्रिय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.