Thergaon News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामणशेठ बारणे यांचे कोरोनाने निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामणशेठ बारणे यांचे कोरोनामुळे आज (शनिवारी) निधन झाले. त्यांचे वय 70 होते. दुपारी पावणे बाराच्या सुमारास पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेना नगरसेवक निलेश बारणे यांचे ते वडील, तर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे ते मोठे बंधू होत.

थेरगावच्या उपसरपंचपदापासून हिरामणशेठ बारणे यांनी समाजकार्याला सुरुवात केली. महापालिकेच्या स्थापनेनंतर 1986 च्या पहिल्या निवडणुकीत थेरगावमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1988-89 मध्ये हिरामणशेठ बारणे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. त्याचबरोबर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.

थेरगावसारख्या अविकसित भागात नगरसेवक म्हणून त्यांनी मोठे काम केले. पाण्याची योजना, रस्ते, वीज अशी विविध कामे केली. प्राधिकरणाने ग्रासलेल्या थेरगाव भागात नगरसेवक म्हणून सर्वाधिक विकास कामे हिरामणशेठ बारणे यांनी केली.

अर्धांगवायूवरील उपचारासाठी 15 दिवसांपूर्वी ते निपाणीला गेले होते. येताना कोल्हापूरला मुक्काम केला होता. येतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. पुना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. नगरसेवक निलेश बारणे, उद्योजक महेश बारणे यांचे ते वडील होत. तर, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे मोठे बंधू होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.