Thergaon News : प्रसुंधाम सोसायटीचा ‘गो ग्रीन’साठी पुढाकार; कोरोना काळात ‘इमर्जन्सी टीम’ कार्यरत

एमपीसी न्यूज – केवळ टोलेजंग इमारतीमध्ये राहणे म्हणजे हायटेक होणे नव्हे. तर त्या टोलेजंग इमारतींचे व्यवस्थापन, तिथल्या नागरिकांची आणि निसर्गाची काळजी घेऊन समतोल जपणे म्हणजे हायटेक जगणे आहे. असा आदर्श थेरगावमधील प्रसुंधाम को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने घालून दिला आहे. कोरोना काळात सोसायटीच्या ‘इमर्जन्सी टीम’ने पुढाकार घेऊन सोसायटी कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच सोसायटीत गो ग्रीन अंतर्गत विविध प्रकल्प राबवून पर्यावरणाशी समतोल देखील राखला आहे.

थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलसमोर 11 टोलेजंग इमारतींची प्रसुंधाम को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये 229 सदनिका आहेत. सोसायटीमध्ये सोलर प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्यात आले आहेत.

कोरोना काळात स्थापन केलेल्या इमर्जन्सी टीम आणि तिच्या कामाबद्दल सांगताना प्रसुंधाम सोसायटीचे सचिव किशोर सराफ म्हणाले, “कोरोनाची दुसरी लाट भयानक होती. या लाटेत सोसायटीमधील सुमारे 24 नागरिक कोरोना बाधित झाले. काही जणांना गृह विलगिकरणात ठेवण्यात आले तर काहींना हॉस्पिटलची गरज भासली. अशा वेळी नागरिकांची मदत करण्यासाठी तसेच सोसायटीला कोरोनामुक्त करण्यासाठी आम्ही ‘इमर्जन्सी टीम’ बनवली.

सहा जणांच्या टीमने गृह विलगिकरणातील नागरिकांच्या घरी साहित्य, औषधे पोहोचविण्याचे काम केले. ज्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची आवश्यकता होती त्यांना बेड मिळवून देण्यासाठी, प्रवासासाठी ई-पास मिळवून देण्यास देखील या टीमने मदत केली. आता सोसायटी कोरोनामुक्त झाली आहे.”

सोसायटीचे उपाध्यक्ष ललित चौधरी यांनी सोलर प्रकल्प आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत माहिती दिली. प्रसुंधाम सोसायटीने साडेतीन वर्षांपूर्वी सोलर प्रकल्प उभारला. त्यावर सोसायटीचे पाण्याचे पंप आणि इतर साधने चालतात. यामुळे सोसायटीचे दरवर्षी सुमारे साडेचार लाख रुपयांची बचत होते.

पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी दोन बोअर खोदले असून त्यात पावसाचे पाणी सोडले जाते. त्यावर प्रक्रिया करून पुन्हा ते पाणी वापरले जाते. मागील एक वर्षापासून हा प्रकल्प कार्यान्वित झाला असल्याचेही चौधरी म्हणाले.

सोसायटीचे खजिनदार प्रसाद तांदळे म्हणाले, “सोसायटीमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा जमा केला जातो. सुका कचरा महापालिकेकडून नेला जातो. तर ओला कचरा कुजवून त्याचे सोसायटीच्या आवारात कंपोस्ट खत तयार केले जाते. गार्बेज किट बनवले असून ठराविक कालावधीनंतर यातील कचऱ्याचे खत तयार होते. हा प्रकल्प चार महिन्यांपासून सुरू झाला आहे.

आतापर्यंत 350 किलो कंपोस्ट खत तयार झाले आहे. हे खत सोसायटीच्या एका सदस्याने त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विकत घेतले. इथे तयार होणारे खत विक्रीसाठी सोसायटीच्या सदस्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर बाहेर विक्रीचा पर्याय शोधला जाणार आहे.”

पर्यावरणपूरक प्रकल्प राबविल्यामुळे प्रसुंधाम सोसायटीला भविष्यात महापालिकेच्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकतो. अन्य सोसायट्यांनी देखील अशा प्रकारचे प्रकल्प उभारणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.