Thergaon News : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मसापकडून खासदार बारणे यांना निवेदन

एमपीसी न्यूज – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन, निवेदन दिले.

यावेळी शिष्टमंडळातील सदस्य मसाप उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, श्रीकांत जोशी, डी. बी. शिंदे, राधाकृष्ण कुलकर्णी, रवींद्र झेंडे, सुहास घुमरे, श्रीपाद सटवे, विजय शेंडगे आदि उपस्थित होते.

‘अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी असलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. तरीही मराठीला अभिजात दर्जा पासून वंचित ठेवले जात आहे ही खेदाची बाब आहे,’ असे राजन लाखे म्हणाले.

दरम्यान, माझे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्याशी बोलणे झाले असून अभिजात दर्जा बाबतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याची घोषणा होणे बाकी असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

दोन वर्षापूर्वी मसाप पिंपरी चिंचवड शाखेने खासदार बारणे यांना यासंदर्भात निवेदन सादर केले होते. बारणे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. तद्नंतर मसाप पुणे, सातारा व पिंपरी चिंचवड शाखेचे अनुक्रमे मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, राजन लाखे यांनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे जाऊन तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या संदर्भात ठाम भूमिका घ्यावी असे निवेदन त्यावेळी त्यांना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.