Thergaon : खिंवसरा विद्यालयात रंगली पालक सभा

एमपीसी न्यूज- थेरगाव येथील खिंवसरा विद्यालयात मुख्याध्यापकांनी शाळेतील विविध उपक्रम, शाळेत झालेल्या सुधारणा, शाळेतील सुविधा, गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेले प्रयत्न यांचा आढावा घेतला निमित्त होते पालक सभेचे.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील विद्यामंदिर या शाळेत सन 2018 -19 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिली ते सातवीच्या पालकांची शेवटची पालक सभा घेण्यात आली. यावेळी सुमारे 250 पालक उपस्थित होते. पालक सभेत बोलताना शाळेचे मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी संपूर्ण वर्षाचा आढावा पालकांना सांगितला व मिटिंगच्या निमित्ताने पालकांशी सुसंवाद साधला.

शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात यामधून संत, क्रांतिकारक, शास्त्रज्ञ, गणिततज्ञ, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांचा आदर्श घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध विषयावर वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, गटचर्चा, वेशभूषा स्पर्धा, नाट्यीकरण, गायन, कथाकथन असे विविध कार्यक्रम आयोजित केले. यातून विद्यार्थ्यांना अवांतर गोष्टींची आवड निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. क्रीडा क्षेत्रात सुद्धा शाळेतील विद्यार्थी झळकले. प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे विसाव्या वर्धापन दिनानिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रियांका गुप्ता हिचा प्रथम क्रमांक व पूजा शेरे हिचा तृतीय क्रमांक आला त्यांना रोख रक्कम व ट्रॉफी बक्षीस मिळाले.

आपल्या शाळेत इयत्ता पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षेस बसवले जाते. इंडियन टॅलेंट परीक्षा, ज्ञानांजन परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, टि. म. वी. ची हिंदी व इंग्रजी विषयांची परीक्षा, संस्कृती ज्ञान परिक्षा इत्यादी परीक्षांना विद्यार्थी बसवले जातात. यावर्षी इंडियन टॅलेंट या परीक्षेत इयत्ता पहिली मधील वैभव बर्डे हा राज्यात नववा आला व केतन सांगडे हा राज्यात बारावा आला. आपल्या शाळेला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. सदर परीक्षेचे तास शाळेत दर रविवारी सुरू असतात एकही रविवार शाळा चालू नाही असे होत नाही. त्याचप्रमाणे I.S.O. मानांकनही शाळेला मिळाले आहे तसेच आपल्या शाळेतील पुष्पा जाधव व मंजुषा गोडसे यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

आपल्या शाळेतर्फे इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे मुला मुलींचे वेगवेगळे निवासी स्वावलंबन शिबिर आयोजित केले जातात. यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य भावना, परोपकार, वक्तृत्व, स्वच्छता, वेळेचे महत्व इत्यादी गुणांची जोपासना झाल्याचे दिसून आले.

समाज प्रबोधनासाठी विद्यार्थ्यांचे पथनाट्य बसवले जाते यामध्ये पर्यावरण पूरक वस्तू, प्लास्टिक वस्तूंचा वापर करू नये, स्वदेशी वस्तूंचा वापर, पाण्याची बचत, स्वच्छता, बेटी बचाओ, स्त्री-पुरुष समानता, पाणीबचत इत्यादी सामाजिक विषयांवर पथनाट्य बसवून ते समाजामध्ये सादर केले आहे. याचा योग्य परिणाम समाजातील लोकांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला, विद्यार्थी-पालक-शिक्षक- संस्थाचालक यांमधील नाते अधिक दृढ होण्यासाठी दरवर्षी *पालक सहलीचे* आयोजन केले जाते. यावर्षी सहलीसाठी 14 गाड्या नेण्यात आल्या व 550 पालकांनी सहलीचा आनंद लुटला.

शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवतात तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांना मार्गदर्शन करतात. सेवा वस्तीतील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाविषयी शिक्षकांनी प्रबोधन केले आहे. विद्यार्थ्यांनी परिसरात फिरून आर्थिक मदत गोळा करून वनवासी कल्याण आश्रमास दिली आहे.अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने विद्यार्थी व पालकांच्या मदतीने अन्नदान केले आहे. शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढून शिवाजींचा इतिहासच जनतेसमोर जागृत केला. शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मदतीने औषधी वनस्पतींची बाग तयार केली आहे तसेच विविध पानाफुलांची झाडे लावून शाळेची शोभा वाढवली आहे. शाळेत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शाळेच्याच बागेतील पानाफुलांच्या साह्याने बुके तयार करून केली जाते.

शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते यातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, निरीक्षणशक्ती चा विकास, स्वनिर्मिती, अंधश्रद्धा निर्मूलन, टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे या गुणांची जोपासना होते. विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते यातून त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते शाळेत डिजिटल साधनांचा वापर अध्यापनात केला जातो. टॅबद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण आयोजित केले जाते, विद्यार्थी लेखन वाचन यामध्ये मागे राहू नये म्हणून स्वाधार या संस्थेतर्फे वाचनाचे तास घेतले जातात. अक्षर भारती या संस्थेने अनेक पुस्तके शाळेस भेट दिली आहेत या पुस्तकांचा वाचनासाठी उपयोग केला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागली आहे. तसेच प्रथम एज्युकेशन या संस्थेतर्फे सुद्धा संगणकाच्या सहाय्याने शिक्षण दिले जाते. अनेक प्रकारच्या मातीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण शुद्ध विद्यार्थ्यांना दिले गेले. आजी आजोबा मेळावा घेतला गेला. यातून एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे समजावून सांगण्यात आले, तसेच आजी-आजोबांच्या अनुभवाचा फायदा हा कुटुंबातील सर्वच व्यक्तींना होतो याची जाणीव करून दिली गेली.

पालकांसाठी सुद्धा ह.भ.प. सुभाष गेठे महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन केले होते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती या संस्थेच्या व खिंवसरा पाटील शिक्षण संकुलच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी जर्मन महिला शिरीन टिमरमॅन व त्यांचे पती होळगर टिमरमॅन हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी शाळेचे व शाळेतील उपक्रमांचे खूप कौतुक केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती मध्ये अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रांतिवीर चापेकर स्मारकातील राष्ट्रीय संग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते चापेकर बंधूंच्या तिकिटाचे प्रकाशन झाले यावेळी खासदार श्रीरंग बारणे व पालकमंत्री गिरीश बापट हे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते पुनरुत्थान गुरुकुलम्, चिंचवडगाव मध्ये भुवंदन व गो प्रदान कार्यक्रम घेण्यात आले. विश्वसुंदरी युक्ता मुखी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सरसंघचालक मोहनजी भागवत अशा अनेक नामवंत व्यक्तींनी स्मारकास भेट देऊन संस्थेच्या व शाळेच्या कामाचे कौतुक केले. 18 एप्रिल 2019 रोजी चापेकर बंधूंच्या स्मृतिदिनानिमित्त सर्व पालकांनी “क्रांतीतीर्थ” या चापेकर वाड्यात उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी केले. ह्या सर्व उपक्रमांसाठी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, अध्यक्ष गिरीश प्रभुणे, सहकार्यवाह रविंद्र नामदे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्षा नीता मोहिते, संस्थेचे संचालक गतीराम भोईर, आसाराम कसबे, नितीन बारणे, अशोक पारखी, शकुंतला बंसल, सुनीता शिंदे, मधुसूदन जाधव, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे यांचे मार्गदर्शन लाभते. मुख्याध्यापक नटराज जगताप, सर्व शिक्षक, पालक व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने शाळेत वरील उपक्रम राबवले जातात.

सभेचे प्रास्ताविक दिपाली नाईक यांनी केले व पुष्पा जाधव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.