Thergaon : लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या बॅचलर्सना स्वयंसेवी संस्थेकडून मोफत जेवणाचे डबे

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली त्यानंतर मंगळवारी (दि.24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे शिक्षणासाठी व नोकरीनिमित्त शहरात आलेले बॅचलर घरातच अडकून पडले आहेत. अशा बॅचलर लोकांची खानावळ व हाॅटेल्स बंद असल्याने जेवणाची गैरसोय होत आहे त्यांना थेरगाव सोशल फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेकडून मोफत जेवणाचे डबे पुरवण्यात येत आहेत.

कोरोनामुळे परिसरातील खानावळी व हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बाहेरुन या भागात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यी व नोकरवर्गाच्या जेवणाचे हाल होत होते. त्यामुळे माझा समाज माझी जबाबदारी या सामाजिक जाणिवेतून थेरगाव सोशल फाऊंडेशने हा उपक्रम सुरू करण्याचे ठरविले असे टीएसएफ चे निलेश पिंगळे यांनी सांगितले.

पुलाव आणि रायता कंटेनरमध्ये पॅक करून थेरगाव येथून ते वितरीत केले जातात.यासाठी पिंपरी चिंचवड परिसरात अडकून पडलेल्या अनेकांचे फोन येत आहेत व आम्हाला बाहेर पडता येत नसल्याने डबा द्या, अशी विनंती केली जात आहे. 22 मार्चपासून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात संस्थेच्या वतीने आत्तापर्यंत तब्बल तीनशेपेक्षा अधिक अडकून पडलेल्या विद्यार्थी व नोकरवर्गाला डबे पुरविले आहेत.

यासाठी शंतनू तेलंग, यश कुदळे, विठ्ठल कुदळे, अनिकेत प्रभू, राहुल सरवदे, निलेश पिंगळे, अनिल घोडेकर, अंकुश कुदळे, श्रीकांत धावारे, अमोल शिंदे व थेरगाव सोशल फाऊंडेशनचे सभासद परिश्रम घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.