Thergaon Crime News : पवना नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज – थेरगाव स्मशानभूमीजवळ पवना नदीमध्ये रविवारी (दि. 14) दुपारी चारजण पडले. त्यातील दोघे सुखरूप बाहेर आले. तर दोघेजण बुडाले. त्या दोघांचे मृतदेह सापडले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे मृतदेह सोमवारी (दि. 15) बाहेर काढले आहेत.

पिंटू विठ्ठल गायकवाड (वय 35) आणि ओम प्रकाश जाधव (वय 25, सर्व रा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कॉलनी, काळेवाडी) अशी नदीत बुडालेल्या दोघांची नावे आहेत. तर रवी राजकुमार गायकवाड (वय 13), नरसिंग महादेव जाधव (वय 21) हे दोघेजण पोहून सुखरूपाने बाहेर आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी दुपारी चौघेही खेळण्यासाठी गेले होते. खेळून चौघेही पवना नदीच्या काठावरून थेरगावकडे जात होते. त्यावेळी ओरडण्याचा आवाज ऐकून चौघांनी नदीत उडी मारली. त्यानंतर रवी आणि नरसिंग हे दोघेजण पोहून बाहेर आले.

दरम्यान, पिंटू आणि ओम हे दोघेजण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे जवान आणि ‘एनडीआरएफ’च्या पथकाने शोध कार्य हाती घेतले. जवानांनी बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र अंधार पडल्याने रविवारी ही शोध मोहीम थांबविण्यात आली.

सोमवारी सकाळी बुडालेल्या तरुणांपैकी पिंटू याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांच्या उपस्थितीत हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ओम याचा शोध सुरु केला. सोमवारी दुपारी एनडीआरएफचे पाणबुडे ओमचा शोध घेत होते. त्यांनी अथक प्रयत्न करून गाळात व खडकात अडकलेला ओमचा मृतदेह शोधून बाहेर काढला. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.