Thergaon : पोटच्या मुलींवर कोयत्याने वार करून वडील फरार

आईला वाचविण्याची मुलींना शिक्षा; वाकडमधील धक्कादायक घटना

एमपीसी न्यूज – पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून पती पत्नीला (तिला) मारहाण करू लागला. दरम्यान, आईला वाचविण्यासाठी दोन मुलींनी मध्यस्थी केली असता नराधम वडिलांनी मुलींवर कोयत्याने वार केले. यामध्ये दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून आरोपी वडील फरार झाले आहेत. मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास थेरगाव येथील गुरुनानक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

निकिता विलास सुबुगुडे (वय १६) आणि नीता विलास सुबुगुडे (वय १४, दोघी रा.थेरगाव) अशी जखमी बहिणींची नावे आहेत. याप्रकरणी आई सीता विलास सुबुगुडे (वय ३४) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून विलास नामदेव सुबुगुडे (वय ४५) असे गुन्हा दाखल झालेल्या वडिलांचे नाव आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाले. वारंवार होणारे वाद व मारहाण याला कंटाळून फिर्यादी सीता यांनी आरोपी पतीविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विलासला पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली. याचा राग डोक्यात घेऊन विलास घरी आला. पत्नीला मारहाण करीत कोयता उगारला असता निकिता ही आईला वाचविण्यासाठी मध्ये पडली. मात्र, चिडलेल्या आरोपीने थेट निकिताच्या हातावर वार केले. हे पाहून नीता तिला वाचविण्यासाठी आली असता तिच्याही कानावर वार केले. सीता यांनी मोठ्याने आरडाओरडा केला असता नागरिक जमा झाल्याने विलासने पळ काढला. यात दोन्ही बहिनी गंभीर जखमी झाल्या असून रात्री उशिरापर्यंत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.