Thergaon : ‘माझा समाज माझी जबाबदारी’ अंतर्गत 50 हजार गरजूंना भरवला मायेचा घास

'थेरगाव सोशल फाऊंडेशन'चा उपक्रम : 55 दिवस अखंडीत सेवा

एमपीसी न्यूज – ‘थेरगाव सोशल फाऊंडेशन’ने अनोखं समाज भान जपत लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना 55 दिवस अखंडीत मोफत जेवण पुरवले आहे. ‘माझा समाज माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत तब्बल 50 हजार गरजूंना मायेचा घास भरवला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 24 मार्च रोजी देशात व राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. अचानक लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे शहरात ठिकठिकाणी असलेले कामगार, मजूर, विद्यार्थी व यात्रेकरू आहे त्याच ठिकाणी अडकून पडले.

लाॅकडाऊन मुळे शहरातील हाॅटेल, खानावळ व जेवणाची इतर पर्यायी व्यवस्था अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या. या अव्यवस्थे मुळे नागरिकांचे जेवणाचे प्रचंड हाल व्हायला लागले, या नागरिकांना जेवण पुरवण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढे सरसावल्या. ‘थेरगाव सोशल फाऊंडेशन’ने सुद्धा सामाजिक भान जपत गरजूंना मोफत जेवण पुरवण्याचा विडा उचलला.

या संस्थेने गणेश नगर येथे जेवण वितरण करण्याची व्यवस्था तयार केली. या ठिकाणावरून दररोज 700 ते 800 लोकांना जेवण वितरीत केले जात आहे. जेवण तयार करून वितरण करण्यासाठी वेगवेगळ्या टिम तयार केल्या आहेत. यामध्ये जेवण तयार करणारे, सॅनिटायझेशन, वितरण आणि व्यवस्थापन करण्यासाठी वेगळी टिम तयार केली आहे. या सर्व टिम आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात.

थेरगाव परिसरातील जवळपास 520 रिक्षाचालकांना फाऊंडेशनच्या वतीने रेशन वाटप करण्यात आले आहे.

लॉकडाऊन मुळे शहरातील विविध भागात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यी तसेच कामगार व हातावर पोट असणाऱ्या मजूरांचे जेवणाचे हाल होऊ नयेत, तसेच ‘माझा समाज माझी जबाबदारी’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून व कोणीही उपाशी झोपणार नाही हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही अन्नदानाचे काम सुरू केल्याची भावना, थेरगाव सोशल फाऊंडेशनचे कोरम मेंबर निलेश पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.