Thergaon: लेखकाने तटस्थ होवून लेखन करावे – निरंजन घाटे

एमपीसी न्यूज – एखादं पुस्तक हातात घेऊन अगदी आवर्जून वेळ काढून वाचावेसे वाटणे, हे चांगल्या लेखकाचे लक्षण आहे. लेखकाने आपल्या लेखनात जास्त भावनिक होऊ नये. त्याने तटस्थ होवून लेखन करावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विज्ञानकथा लेखक निरंजन घाटे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ साहित्यिक सुरेश त्र्यंबक पाठक लिखित ‘हृदयस्पर्शी कथा’ आणि ‘विनोदी कथा’ या दोन कथासंग्रहाचे प्रकाशन निरंजन घाटे आणि गदिमांचे सुपूत्र, गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी घाटे बोलत होते.

थेरगावमधील रोझवुड सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रविण कारखानीस, मंगेश वाडेकर, चिंतामणी पाठक, दीपा चौधरी, माधव पाठक, विनायक पोळ, क्षमा गोडसे, प्रशांत पाठक आदी उपस्थित होते. लेखक सुरेश पाठक यांचे पंच्याहत्तरीनिमित्त त्यांचे अभिष्टचिंतनही यावेळी करण्यात आले.

यावेळी घाटे म्हणाले, सुरेश पाठक यांनी विनोदी अंगाने केलेले लेखन अंतर्मूख करणारे आहे. त्यांची पुस्तके वाचताना उत्सुकता वाढते, हेच त्यांच्या कथांचे यश आहे. आनंद माडगुळकर म्हणाले, लेखकाने एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच न लिहिता श्वासात श्वास असेपर्यंत लिहीले पाहीजे. लेखकाने आयुष्याच्या शेवटपर्यंत जे अनुभव येतील, ते मांडावेत, आपला लेखनधर्म सोडू नये. कारण, लेखकाला रिटायरमेंट नसते. लेखकाने व्यक्तीच्या अंतरंगात डोकावून लिहिले, तर अधिक प्रत्ययकारी लेखन होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.