Chinchwad : अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी त्यांनी चोरल्या महागड्या मोटारी

गुन्हे शाखा युनिट एककडून 1 कोटी 13 लाख रुपयांचा सहा मोटारी जप्त

एमपीसी न्यूज – राजस्थान राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी चार जणांच्या टोळीने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून फॉर्च्युनर, इनोव्हा, स्कार्पिओ अशा महागड्या 12 मोटारी चोरल्या. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी या टोळीचा महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये शोध घेत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून 1 कोटी 13 लाख रुपये किमतीच्या सहा महागड्या मोटारी जप्त केल्या आहेत.

ओमप्रकाश लादुराम बिस्नोई (वय 28, रा. रोहिला, जि. बाडमेर, राजस्थान), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसात पिंपरी-चिंचवड शहरातून महागड्या मोटारी चोरीला जाण्याचे सत्र सुरु होते. त्याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे पथक तपास करीत होते. शहरातून चोरीला गेलेल्या वाहनांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. आरोपी पिंपरी-चिंचवड शहरातून मोटारी चोरून त्यांची राजस्थान राज्यात विक्री करीत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. ही टोळी राजस्थानमधून येऊन महागड्या मोटारी चोरी करीत असे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि त्यांच्या सहा कर्मचा-यांचे एक पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले. या पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी ओमप्रकाश याचा हरिद्वार पर्यंत पाठलाग केला. आरोपी हरिद्वार येथून परत राजस्थानकडे येत असताना पोलिसांच्या पथकाने त्याला अजमेर येथे शिताफीने पकडले. पिंपरी पोलीस ठाण्यातील स्कॉर्पिओ चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसह मिळून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून एकूण 12 महागड्या मोटारी चोरल्याचे सांगितले.

या कारवाईमुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार, निगडी पोलीस ठाण्यातील दोन, चिखली, भोसरी, देहूरोड, वाकड, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र राठोड, रवींद्र गावंडे, पोलीस कर्मचारी शिवाजी कानडे, प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, सचिन मोरे, मारुती जायभाये, अंजनराव सोडगीर, प्रमोद गर्जे, प्रवीण पाटील, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर, तानाजी पानसरे, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, नाजुका हुलावळे, मयूर वाडकर यांच्या पथकाने केली.

चेसिस नंबर व इंजिन नंबर बुजवून मोटारींचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर

आरोपी चोरलेली वाहने राजस्थान येथे नेत. तिथे मोटारींचे चेसिस नंबर आणि इंजिन नंबर ग्रॅडरच्या सहाय्याने घासून ते बुजवून टाकत. त्यामुळे मोटारीच्या ओळखीच्या खुना नष्ट होत असत. ओळख नसलेल्या वाहनांना समोरच्या बाजूचा बंपर काढून आतल्या बाजूला लोखंडी बंपर आणि त्याच्यावरून कंपनीचा खरा प्लास्टिक बंपर लावला जात असे. यामुळे एखाद्या वेळी पोलिसांनी नाकाबंदी करून मोटार पकडण्याचा प्रयत्न केला, तरी लोखंडी बंपर असल्याने बॅरीगेट तोडणे आरोपींना सहज शक्य होत असे.

या आहेत जप्त केलेल्या महागड्या मोटारी

आरोपींकडून सहा मोटारी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये तीन फॉर्च्युनर कार आहेत. या मोटारी निगडी पोलीस ठाण्यातील दोन आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील एक आहेत. दोन इनोव्हा कार आहेत. त्यामध्ये भोसरी पोलीस ठाण्यातील एक व दुस-या मोटारीवरील चेसिस नंबर आणि इंजिन नंबर बुजवला असल्याने त्याबाबत पोलीस शोध घेत आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यातील एक स्कॉर्पिओ कार अशा एकूण सहा मोटारी जप्त केल्या आहेत. तसेच गुन्हा करण्यासाठी आरोपींनी वापरलेली मारुती सुझुकी एस एक्स 4 (एम एच 04 / डी जे 3940) ही मोटार देखील जप्त करण्यात आली आहे.

तुरुंगातून सुटल्यावरही त्याचे गुन्ह्याचे सत्र सुरूच

अटक केलेला आरोपी ओमप्रकाश हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला 2011 साली पंजाब राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये तीन साथीदारांसह अटक झाली होती. त्यामध्ये त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो सात वर्ष शिक्षा भोगून सुटलेला आहे. तसेच याला राजस्थानमध्ये देखील दारूच्या तस्करीमध्ये अटक झाली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सुद्धा त्याने गुन्ह्यांचे सत्र सुरूच ठेवले. शेवटी त्याची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी झाली आहे.

शहरात रस्त्यावर वाहने लावल्याने वाहने चोरण्यास सोपी

शहरात पार्किंगची समस्या, जागेची अडचण असल्यामुळे बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केली जातात. हीच वाहने वाहनचोर टार्गेट करतात. रस्त्याच्या बाजूला लावलेल्या वाहनांवर लक्ष ठेऊन ती चोरून नेली जातात. आरोपी ओमप्रकाश याने देखील त्याच्या साथीदारांसह पिंपरी-चिंचवड शहरातून चोरलेल्या वाहनांमध्ये अशाच वाहनांची चोरी करण्यासाठी निवड केली असल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे.

एका आरोपीच्या शोधात पिंपरी-चिंचवड पोलीस थेट पंजाबला

मार्च 2019 मध्ये निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक इनोव्हा कार चोरी झाली. ही कार पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी धुळे येथे पकडली. त्यावेळी पंजाब राज्यातील आरोपींना पोलिसांनी पकडले होते. तर अलीशेर उर्फ इम्रान समशेर अहमद (रा. औरंगाबाद. मूळ रा. अजमगड, उत्तर प्रदेश) याला बुलढाणा येथून अटक केली होती. हे आरोपी चोरलेली वाहने पॉंंडिचेरी आणि पंजाब येथील टोळीला विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. हा गुन्हा करण्यासाठी आरोपींनी वापरलेली स्कॉडा मोटारही पोलिसांनी जप्त केली. या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस थेट पॉंंडिचेरी गाठले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.