Pune : मालकाच्याच गोडाऊनमध्ये चोरी करुन फरार झालेल्या आरोपीला उत्तरप्रदेश येथून अटक

आरोपीकडून 5 लाख 75 हजारांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – काम करत असलेल्या ठिकाणी मालकाच्याच गोडाऊनमध्ये चोरी करून फरार झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण 5 लाख 75 हजारांचा ऐवज जप्त केला गेला.  

राजबाबू सविता (उत्तरप्रदेश), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनंत शंकर खडके(वय 37, राहणार,आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडके यांचे ईन मार्क मुव्ही व्हिजन या नावाने गोडाऊन आहे. आरोपी राजाबाबू सविता देवसिंग चंडेल, उमेश पाल (रायपुरा, उत्तरप्रदेश) हे तिघेही येथे कामगार म्हणून होते. त्यांनी गोडाऊनमधील 8 लाख 45 हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची तक्रार जानेवारी 2018 मध्ये भारती विद्यापीठ पोलिसांकडे आली होती.

या चोरीच्या तपासादरम्यान आठ दिवसांपूर्वी राजाबाबू सविता हा आरोपी त्याच्या गावात घरी आल्याचे समजले. त्याप्रमाणे पोलिसांनी शोध घेऊन आरोपीला त्याच्या घरून (उत्तरप्रदेश) येथून ताब्यात घेतले. आरोपीकडे गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीस अटक करून त्याच्याकडून चार महागडे कॅमेरे, प्रोसेसर, मिक्सर, लेन्स, लॅपटॉप, असा एकूण 5 लाख 75 हजार रुपये किमतीची माल जप्त केला. याबाबत पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

ही कामगिरी पोलीस उपआयूक्त बछन सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप गुरव, पोलीस हवालदार विनोद भंडवलकर, गणेश सुतार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.