Pune Crime News: अट्टल चोरटा जेरबंद, घरफोडीचे शंभर गुन्हे उघडकीस

सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज: घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना चतुःशृंगी पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बंद केले. त्याने आतापर्यंत 100 हून अधिक घरफोड्या केल्या आहेत. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून तब्बल सात लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

जयवंत उर्फ येड्या गोवर्धन गायकवाड (वय 32, रा. डीपी रोड, रा. आंबेडकर वसाहत, औंध, पुणे) असे या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2020 मध्ये शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी वसाहत गणेश खिंड रोड या ठिकाणी घरफोडी झाली होती. पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे आणि त्यांच्या तपास पथकातील कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना ही घरफोडी जयवंत गायकवाड याने केल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर चतुःशृंगी पोलिसांच्या एका पथकाने न्यायालयाच्या परवानगीने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 153 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.