Chikhali Crime News : …..म्हणून एटीएम मधील 17 लाखांची रोकड राहिली सुरक्षित!

एमपीसी न्यूज – चोरटे एटीएम सेंटर मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती संबंधित बँकेच्या नियंत्रण कक्षाला मिळाली आणि त्यानंतर असं काही घडलं की ज्यामुळे चोरटे चोरी करण्याचे सोडून पळून गेले. चोरट्यांना एटीएम फोडता न आल्याने एटीएम मधील तब्बल 17 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली. ही घटना मंगळवारी (दि. 14) पहाटे शिवतेजनगर, चिखली येथे घडली.

याप्रकरणी अशोक वाघमारे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवतेजनगर चिखली येथे युनियन बँकेचे एटीएम आहे. रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरच्या परिसरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन तीन चोरटे एटीएम सेंटर मध्ये आले. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र याची माहिती युनियन बँकेच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी थेट नियंत्रण कक्षातून शिवतेजनगर मधील एटीएम सेंटर मधील सायरन वाजवला. सायरन वाजताच चोरट्यांनी एटीएम सेंटर मधून पळ काढला.

दरम्यान, बँकेच्या नियंत्रण कक्षाने तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी एटीएम सेंटर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढले असून त्यावरून आरोपींचा तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.