Talegaon Dabhade : हा अर्थसंकल्प नव्हे अनर्थसंकल्प; विरोधी पक्ष गटनेते किशोर भेगडेंची टीका

152 कोटींची भांडवली खर्चाची तरतूद; करवाढ नाही

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा सभागृहापुढे मांडलेला अर्थसंकल्प हा अनर्थसंकल्प असल्याची तीव्र प्रतिक्रिया विरोधी पक्ष गटनेते किशोर भेगडे यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी(ता.२१) सन 2019-20 चा अर्थसंकल्प मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सभागृहात सादर केला. मात्र, त्यातील प्रस्तावित कर आणि दर सुधारित करताना तसा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यापूर्वी पटलावर घेणे कायद्याने आवश्यक होते. तो न करता बजेट थेट मंजुरीसाठी आणून प्रशासन सभागृहाची फसवणूक करत आहे, असा थेट आरोप भेगडे यांनी सभागृहात केला.

  • वाढीव दरामध्ये सुधारणा करण्याचा ठराव पारित करूनच अर्थसंकल्पास मंजुरी द्यावी, अशी उपसूचना नोंदवून त्यांनी सभागृह सोडले. या उपसुचनेस नगरसेविका मंगल भेगडे अनुमोदक आहेत. दरम्यान, नगरसेवक गणेश खांडगे यांनी पुलवामा शाहिदाना श्रध्दांजलीचा विषय मांडल्यानंतर सभागृहाने दोन मिनिटे उभे राहून शाहिदांप्रति सहवेदना व्यक्त केल्या.

सभागृह सोडण्यापूर्वी किशोर भेगडे यांनी सर्व नगरसेवकांनी त्यांच्या वर्षभरातील मिटिंगचा भत्ता शहिदांच्या कुटुंबियांना देण्याचे आवाहन केले. त्यास सर्व नगरसेवकांनी बाके वाजवून मंजुरी दिली. अर्थसंकल्प वाचन दुपारी 12.35 वाजता लेखापाल ज्ञानेश्वर मोहिते यांनी सुरू केले. त्यानंतर विरोधीपक्ष कक्ष बाके रिकामा असताना सत्ताधारी नगरसेवकांच्या अर्थसंकल्पीय चर्चेचे सत्र सुरू झाले. सन 2019-20 चा अर्थसंकल्प आज दुपारी तीन वाजेपर्यंत बहुमताने मंजूर होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.