Pimpri : ही लढाई जाती-धर्माची नसून भारतीयतेची आहे – डॉ. सुषमा अंधारे

एमपीसी न्यूज – ही लढाई केवळ हिंदू किंवा मुस्लिमांची नाही. ही लढाई भारतीयतेची आहे. हिंदू, मुस्लिम कोणीही असुरक्षित नाही. सध्या देशात संविधान असुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारांना वाचवण्याची ही लढाई आहे, असे मत डॉ. सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

संविधान बचाओ समिती पिंपरी चिंचवड, कुल जमाअती तंझीम पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात महानिषेध सभा घेण्यात आली. यावेळी डॉ. सुषमा अंधारे बोलत होत्या. निषेध महासभेत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

अमित शहा, नरेंद्र मोदी यांची जोडी सध्या देशभर खूप गाजत आहे. दरम्यान, अमित शहा गांधीजींनी सीएए बद्दल बोलल्याचे सांगितले जात आहे. अमित शहा हे धादांत खोटे बोलत आहेत. अशोक वाजपेयी यांनी एक पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्यामध्ये एप्रिल 1947 ते जानेवारी 1948 या कालावधीत गांधीजींच्या प्रवाचनांचा उल्लेख आहे. त्यात सीएए बद्दल कुठेही उल्लेख नाही. नागरिकत्व नोंदणीसाठी येणाऱ्या लोकांना देशातील नागरिक मोदींनी केलेल्या आश्वासानंबद्दल प्रेमाने बोलून 15 लाख रुपये, देशाची आर्थिक स्थिती याबद्दल त्यांना नागरिक जाब विचारणार आहेत.

एअर इंडिया, रेल्वे आदींचे खासगीकरण केले जात आहे. चहा विकता विकता मोदी यांनी देश विकायला सुरुवात केली आहे, असे म्हणत डॉ. अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. “राज ठाकरे यांनी एक रॅली काढली. त्यात घुसखोरांना बाहेर काढण्याची घोषणा केली. दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनात घुसखोर महिला येऊन बसते. त्याबद्दल ठाकरे काहीच बोलत नाहीत. राज ठाकरे यांच्या इंजिनला डिझेल नागपूरमधून पुरवले जात आहे, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

देशविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांना आश्रय देणाऱ्यांना देशातून बाहेर घालवण्याची चर्चा होते. पण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत सरकार काहीच बोलत नाही. भारतात पासपोर्ट वरून आपल्या नागरिकत्वाची ओळख होत नसल्याचे सरकार म्हणत आहे. मात्र, विदेशात पासपोर्टवरून आपल्या भारतीयत्वाची ओळख होते. मग पासपोर्ट काढण्याचा खर्च कशाला करायला लावला, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.

अनेक नागरिकांच्या कागदपत्रांमध्ये किरकोळ चुका आहे. पण या चुका सरकार मान्य करायला तयार नाही. मग या सगळ्या नागरिकांना भारतातून हाकलून देणार का ? ज्यांच्याकडे जन्माचा दाखला नसेल तर त्या नागरिकांचे नागरिकत्व मान्य होणार नाही. ज्यांचा जन्म घरी झाला असेल ते लोक कुठून जन्माचा दाखला आणणार? हा पेच सोडवण्याबाबत सरकार काहीच बोलत नाही. याबाबत सर्व मुस्लिम समाज एकत्र आला आहे.

ही लढाई जिंकून दाखवणार असल्याचे सांगत महाराष्ट्र शासनाने एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधाच्या आंदोलनाला सहकार्य केले आहे. त्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करत ‘सीएए ठुकराएंगे, कागज नहीं दिखाएंगे’, ‘मोदी तुम चाय बेचो, देश नहीं देश नहीं’, ‘आवाज दो, हम एक है’ अशा घोषणा देऊन निषेध महासभेची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.