Pimpri : हिंदुत्ववादी पक्षांपासून हिंदूंची मते तोडण्याचे षड्यंत्र; सनातन संस्थेचा आरोप

दाभोळकर हत्येचा तपास होण्यापूर्वीच सनातन संस्था बंद होण्याची मागणी का; सनातन संस्थेचा सवाल 

एमपीसी न्यूज – डाव्या चळवळीतील नेत्यांनी चेहर्‍यावर पुरोगामी, समाजवादी कार्यकर्त्यांचा बुरखा ओढून समाजात आपले विचार पसरवण्याचे कार्य केले. त्यांचा शहरी नक्षलवाद आता उघड होत आहे. बंगाल, केरळ, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या हत्या घडवून हिंदू संघटनांना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही ते शक्य न झाल्याने आता हिंदुत्ववाद्यांना आतंकवादी ठरवून, या संघटनांना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातूनच सनातनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. हे सर्व हिंदुत्ववादी पक्षांपासून हिंदूंची मते तोडण्याचे षड्यंत्र सुरु आहे. असा आरोप सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी केला. 

राजहंस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हा आरोप करण्यात आला आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, “अनेक वर्षे राज्यावर पुरोगामी विचारसरणीच्या राजकीय पक्षांची सत्ता होती. त्या काळात प्रशासनात पुरोगामी विचारसरणीच्या अधिकार्‍यांचा भरणा करण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे, महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष मराठे यांना पोलिसांनी अटक केली. गृहखाते स्वतःकडे असलेल्या मुख्यमंत्र्यांना याबाबत कानोकानी खबरही लागली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे सांगतात. काही पुरोगामी उच्चपदस्थ अवॉर्ड वापसीचे दबावतंत्र वापरतात ! याचा लाभ उठवण्यासाठी आतंकवादी झाकीर नाईकला मिठ्या मारणारे, आतंकवाद्यांच्या घरी जाऊन आर्थिक साहाय्य करणारे काँग्रेसचे नेते सनातनवर बंदी घालण्याची मागणी करतात. त्यामुळे येणार्‍या काळातील लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हे एखादे षड्यंत्र तर नाही ना, याचा विचार व्हायला हवा.”

हिंदुत्ववाद्यांवर कारवाई केल्याने एक तर हिंदुत्ववाद्यांना नाराज करून त्यांची मते भाजपपासून तोडणे आणि दुसरीकडे हिंदूंना आतंकवादी ठरवून अल्पसंख्य समाजाची एकगठ्ठा मतांची बेगमी करणे, असे एका बाणात दोन पक्षी मारण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत सनातन संस्था हाच एकमेव तपासाचा केंद्रबिंदू मानून तपास केला गेला आहे. कोणताही पुरावा नसताना सनातन संस्थेला दोषी ठरवले गेले. या प्रकरणात सुरुवातीला सनातनच्या अनेक साधकांची चौकशी केली गेली. त्यांना या हत्येला जबाबदार धरण्यात आले. नंतर अन्य काही साधकांची नावे घेऊन ते फरार असल्याचे आणि मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले गेले. आता अन्य दोघांना अटक केली आहे. दाभोळकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल ज्यांच्याकडे मिळाले, ते नागोरी आणि खंडेलवाल यांचे काय ? सनातनच्या अनेक साधकांची नावे घेतली, त्यांचे काय? असेही पत्रकात म्हटले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.