Pune News: सामूहिकपणे लढून हे दुसरं संकट नक्की टाळता येवू शकेल : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज : जगातील शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांच्या अनुमानानुसार जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना सावधान करणारं ट्विट केलं आहे. मोहोळ आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, आगामी काळात कोरोना संसर्ग वाढू शकतो, ही शक्यता विचारात घेऊन आपण नजीकच्या भविष्यकाळातील नियोजन केलंय, यंत्रणाही सज्ज आहेत. पण आपणा सर्वांनाच अधिकची काळजी घेऊन हे संभाव्य संकट टाळायचं आहे. सामूहिकपणे लढून हे दुसरं संकट नक्की टाळता येवू शकेल.

 

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.17) दिवसभरात एकूण 368 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील 163 जण आहेत.दिवसभरात 3 हजार 139 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत 420 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील सहा, पिंपरी चिंचवड पाच, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार आणि नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

 

पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णांलयात 3 हजार 932 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 5 हजार 314 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 32 हजार 145 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 14 हजार 867 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 196 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 385 रुग्ण आहेत.

 

पिंपरी चिंचवडमध्ये 95, जिल्हा परिषद क्षेत्रात 89, नगरपालिका क्षेत्रात 15 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 6 नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. कोरोना लसीबाबतची पूर्ण तयारी झाली आहे. फ्रंटलाइन वर्कर्सची यादी तयार झाली आहे. कोल्ड स्टोरेज व्यवस्था पूर्ण होत आली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे, असंही ते म्हणाले. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत लस आलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला लस कधी उपलब्ध होणार याबाबत आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून माहिती मागवली आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.