Pimpri News: अर्थसंकल्पातील ‘या’ उपसूचना अग्राह्य

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात स्थापत्य क्रीडा विभागाच्या आणि झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी चादर, कांबळ, पंजा आणि बेडशीट व संसारोपयोगी साहित्य वाटणे यासाठी 16 कोटी 80 लाख रुपयांची वाढ सूचविण्यात आलेल्या उपसूचना लेखा विभागाने अग्राह्य ठरविल्या आहेत.

स्थापत्य क्रीडा विभाग नव्याने निर्माण करण्यात आल्यावर अर्थसंकल्पात या विषयीच्या नव्वद कामांचा समावेश उपसूचनेद्वारे करण्यात आला. त्यात प्रामुख्याने क्रीडांगणे, तरण तलाव,व्यायामशाळा, वाचनालय, लॉन टेनिस, क्रीडा संकुल, विविध मैदाने, यांच्या देखभाल – दुरुस्ती कामांचा समावेश होता. तथापि, या नव्वद उपसूचना अग्राह्य ठरविण्यात आल्या.

जलनि: सारण विभागासाठी 22 कामांची जंत्री उपसूचनेद्वारे जोडण्यात आली होती. तथापि, या 23 कोटी रुपयांच्या कामांना अग्राह्य ठरविण्यात आले आहे. कें शासनाच्या निर्देशानुसार खर्च करणे आवश्यक वाढ आणि घट रकमेत तफावत असल्याचा शेरा मारण्यात आला आहे.

कोरोना निधीसाठी मध्यवर्ती भांडारे विभागाकडे 10  कोटी रुपये ठेवण्याची तरतूद अग्राह्य ठरविण्यात आली आहे. अखर्चित रक्कम निश्चित नसल्याचे कारण लेखा विभागाने दिले आहे.विशेष योजना अंतर्गत स्पाईन रस्त्यापासून देहू – आळंदी रस्त्यापर्यंतचा फुटपाथ नुतनीकरण करण्यासाठी 30 कोटी रुपये आणि केएसबी चौकात शिल्प उभारणे कामाची उपसूचना अग्राह्य ठरविण्यात आली. दुबार उपसूचनेचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.

झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी चादर, कांबळ, पंजा आणि बेडशीट व संसारोपयोगी साहित्य वाटणे यासाठी 16 कोटी 80 लाख रुपयांची वाढ सूचविण्यात आली होती. त्यासाठी ज्येष्ठ नागरिक धोरण व उपक्रम राबविणे, महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे, या कामांमध्ये घट सूचविण्यात आली. तथापि, शासनाच्या निर्देशानुसार राखीव निधीस 5 टक्के तरतूद ठेवणे बंधनकारक असल्याने घट करणे शक्य नसल्याचे लेखा विभागाने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.