American President Election: अबकी बार अमेरिकेत बायडन सरकार ?

बायडन विजयाच्या उंबरठयावर

एमपीसी न्यूज  : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा अंतिम निकाल थोड्याच वेळात समोर येणार आहेत. कालपासून सुरु असलेल्या मतमोजणीनंतर आता निकालाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. बायडन यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज आहे, तर बायडन यांनी आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळवले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत. 

आमचं प्रशासन पुढील 77 दिवसात पॅरिस करारात सहभागी होईल : बायडन

मतमोजणीदरम्यान जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

पॅरिस करारातून बाहेर पडणाऱ्या ट्रम्प प्रशासनावर बायडन यांनी टीका केली आहे. तसेच बायडन म्हणाले की, आज ट्रम्प प्रशासन अधिकृतपणे पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडलं आहे. आमचं प्रशासन पुढील 77 दिवसांमध्ये पुन्हा या करारात सहभागी होईल.

मिशिगन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये बायडन विजयी

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडन यांनी कोलोरॅडो, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मेसाचुसेट्स, न्यू मेक्सिको, वरमोन्ट आणि वर्जिनियामध्ये विजय मिळवला आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे बायडन यांनी मिशिगन, विस्कॉन्सिन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्येदेखील विजय मिळवला आहे. न्यूयॉर्कमध्ये बायडन यांना 22 लाख मतं तर ट्रम्प यांना 12 लाख मतं मिळाली आहेत.

जॉर्जियामधील मतमोजणी रोखण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न

US मीडियाच्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जियामध्ये मतमोजणी रोखण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

पेन्सिलव्हेनियामधील निकाल अद्याप बाकी

विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज असताना बायडन यांना आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळले आहेत. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत. त्यामुळे बायडन विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र त्यांचा विजय अद्याप निश्चित नाही, कारण, अद्याप नेवादा आणि पेन्सिलव्हेनियासारख्या महत्त्वाच्या राज्यांमधील निकाल समोर आलेले नाहीत. या दोन्ही राज्यांमधील निकाल दोन्ही नेत्यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.