Pune : पोलिसांच्या नियोजनामुळे यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक तीन तास लवकर संपली

सकाळी साडेदहा वाजता सर्व गणेश मंडळांनी बाप्पांचे विसर्जन केले

एमपीसी न्यूज – पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक हा अतिशय वैभवशाली नेत्रदीपक सोहळा असतो. त्याचबरोबर मिरवणुकीचा वेळ याकडेही सर्वांचे लक्ष असते. यंदाच्या वर्षी पोलिसांच्या चोख नियोजनामुळे गणेश विसर्जन मिरवणूक तीन तास लवकर संपली. सकाळी साडेदहा वाजता सर्व गणेश मंडळ टिळक चौकातून मार्गस्थ होऊन विसर्जन मिरवणूक पार पडली. मागील वर्षी मिरवणूक दीडच्या सुमारास संपली होती. 

यंदा एकूण 3193 गणेश मंडळ तर 4 लाख 33 हजार 930 घरगुती गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. गुरुवारी (दि.12) सकाळी साडेदहा वाजता मानाचा पहिला कसबा पेठ गणपतीची महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती करून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरी वाडा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होऊन सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत नटेश्वर घाट आणि पांचाळेश्वर घाटावर या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर एकूण 602 मंडळांनी अलका टॉकीज चौकातून मार्गस्थ होऊन नटेश्वर घाट आणि पांचाळेश्वर घाटावर विसर्जन केले.

ही मिरवणूक आज शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास पुन्हा सुरू होऊन नऊच्या सुमारास थंडावली होती. दगडूशेठ हलवाई गणपतीचे सकाळी आठ वाजता पांचाळेश्वर  घाटावर विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अन्य सर्व गणेश मंडळांना लवकर मार्गस्थ होण्यासाठी आवाहन केले. तसेच स्पीकर बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी केलेल्या चोख नियोजनामुळे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गणेश विर्सजन मिरवणुकीची सांगता झाली. यंदाची मिरवणूक मागील वर्षीपेक्षा तीन तासांनी लवकर संपली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.