Pimpri: विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशिवाय यंदा स्वातंत्र्यदिन होणार साजरा

This year Independence Day will be celebrated without the presence of students.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर यंदा प्रथमच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशिवाय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळांच्या मैदानाऐवजी घरात बसूनच स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार आहे.

शाळा-महाविद्यालयात स्वातंत्र दिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण मोठ्या धुमधडाक्‍यात साजरे केले जातात. यंदा; मात्र कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील शाळा, महाविद्यालये अद्यापही सुरू झालेली नाहीत.

त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना घरीच स्वातंत्र्यदिन साजरा लागणार आहे. स्वातंत्र्य दिनाची शाळेच्या व्यासपीठावर भाषणे करता येणार नाहीत. मुलांशिवाय हा पहिलाच स्वातंत्र्यदिन शाळा व्यवस्थापनेला साजरा करावा लागणार आहे.

याबाबत पालिकेच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे म्हणाल्या, ‘शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्यासह केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत सकाळी साडेआठ पूर्वीच ध्वजवंदनाचा कार्यक्रम उरकायचा आहे.

सर्व माध्यमांच्या शाळांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षित अंतराचे पालन करावे, सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी शाळेत बोलविण्यात येऊ नये.

शाळा प्रतिबंधित क्षेत्रात असू नये. या कार्यक्रमासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे’ त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.