Muharram News: यावर्षी मोहरम साध्या पद्धतीने पाळावा; शासनाचे नागरिकांना आवाहन

This year muharram should be observed in a simple manner; Government appeals to citizens कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे मोहरम देखील आपापल्या घरात राहूनच दुखवटा पाळण्यात यावा.

एमपीसी न्यूज – कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता इतर कार्यक्रमांप्रमाणेच या वर्षी मोहरम देखील साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबत शासनाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

मातम मिरवणूक

कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे मोहरम देखील आपापल्या घरात राहूनच दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा करु नये.

वाझ/मजलीस

हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत.

ताजिया/आलम

ताजिया/आलम काढण्यास परवानगी देता येणार नसल्याचे राज्य शासनाच्या आदेशात म्हटले आहे. ताजिया/आलम घरीच/घराशेजारी बसवून तेथेच शांत/ विसर्जन करण्यात यावेत.

सबील/छबील

सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. त्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

कोणत्याही कार्यक्रमात चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही.

कोविड- 19 च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबीरे, प्लाज्मा शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.

कोविड- 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी जाहीर केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहिल, असेही आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.