Talegaon : पूरग्रस्त भावंडांसाठी अनोख्या पद्धतीने साजरा करूयात यंदाचा स्वातंत्र्यदिन

तळेगाव दाभाडे येथील प्रवीण माने यांचे आवाहन 

एमपीसी न्यूज – सांगली, कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात आलेल्या पूरसंकटामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. राज्यभरातील जनतेने आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यातच भर घालत यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा करून पूरग्रस्त बांधवांना मदत करूयात, असे आवाहन तळेगाव दाभाडे येथील डॉ. प्रवीण माने यांनी केले आहे. यावर्षी भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून 73 रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदतनिधीमध्ये जमा करून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा संकल्प केला आहे.

गुरुवारी (15 ऑगस्ट) एकीकडे देश 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असेल. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली तसेच जवळपासच्या पूरग्रस्त भागातील नागरिक नियतीशी लढा देत असतील. या सर्वांना मदत करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. सर्वांना पूरबाधित भावंडांना मदत करण्याची इच्छा असते, पण योग्य दिशा मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून फक्त 73 रूपये जर मुंख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले तर 12 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून आपल्या पूरग्रस्त भावंडांना भरभक्कम मदतनिधी उभा करू शकेल. त्यामुळे # MISSION73VISION73 अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतनिधी जमा करून माणूसकीचा महापूर आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रक्कम जमा केल्यानंतर त्याचा स्क्रिनशॉट काढून आपल्या फेसबुकवर पोस्ट करावा. पोस्ट करताना # MISSION73VISION73 याचा वापर करावा. आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अन्य बांधवांना प्रेरणा मिळेल. त्यातून ते देखील मदत करण्यासाठी प्रेरित होतील.  महाराष्ट्रात सर्वाधिक याच पोस्ट असतील याचा संकल्प करून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी( मुख्य खाते) –
खाते क्रमांक – 10972433751
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा,
फोर्ट , मुंबई 400001
शाखा कोड – 003000
आय.एफ.एस.सी.कोड – SBIN0000300
मदत करण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क – 9270212312

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.