Bhosari : फॉर्च्यूनर कार खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला साडेसहा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – फॉर्च्यूनर कार साडेआठ लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरवून त्यातील दोन लाख रुपये आगाऊ दिले. उर्वरित साडेसहा लाख रुपये चेकने देण्याचे ठरवून आरोपी कार घेऊन पसार झाले. चेक बँकेत वाटलाच नाही. यावरून चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महम्मद सर्फराज गौस (वय 32, रा. केशवनगर, कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महम्मद अहमद हुसेन शेख, महम्मद युसूफ हुसेन शेख, महम्मद शौकत हुसेन शेख, नईम (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. सर्फराज गंज, कॉलनी, चारमिनार, आंध्र प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महम्मद गौस यांच्याकडे फॉर्च्युनर कार आहे. ती त्यांना विकायची होती. त्यांची कार घेण्याचा आरोपींनी बहाणा केला. कार 8 लाख 50 हजार रुपयांना विकत घेण्याचे ठरले. आरोपींनी त्यातील दोन लाख रुपये महम्मद गौस यांना रोख दिले. उर्वरित 6 लाख 50 हजार रुपयांचा आरोपींनी चेक दिला.

आरोपींनी दिलेला चेक घेऊन महम्मद गौस बँकेत गेले असता चेक बाउंस झाला. चेक बाउंस झाल्याचे सांगण्यासाठी त्यांनी आरोपींना फोन केला. आरोपींनी फोनला उत्तरच दिले नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.