Dighi crime news : घरावर प्लास्टिक कागद टाकल्याचा जाब विचारल्यावरून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – घरावर प्लास्टिक कागद टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन पाच जणांनी तरुणाला आणि त्याच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) दुपारी साडेतीन वाजता दिघी गावठाण येथील विठ्ठल मंदिरासमोर घडली.

विश्वकांत वाळके, ऋतिक वाळके, निलेश वाळके, अनिता वाळके, भारत वाळके (सर्व रा. दिघी गावठाण, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शुभम संतोष वाळके (वय 24, रा. विठ्ठल मंदिरासमोर, दिघी गावठाण) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी राहण्यास असून ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपींनी फिर्यादीच्या घरावर प्लास्टिकचा कागद टाकला. त्याबाबत फिर्यादी यांनी आरोपींकडे विचारणा केली. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी शुभम आणि त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ केली. तसेच घराच्या दरवाजावर दगडफेक केली. आरोपी ऋतिक आणि निलेश यांनी शुभम यांच्या दुचाकीवर दगड मारून तिचे नुकसान केले. त्यानंतर आरोपी विश्वकांत आणि अनिता यांनी शुभम आणि त्यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.