Pune News : पोलीस आयुक्तांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याचे भासवून महिलेला ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : पती-पत्नीच्या वादातून अन्य दोन इसमांनी पतीची बाजू घेत पोलीस आयुक्तांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याचे भासवून पत्नीला ठार मारण्याची धमकी दिली. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जनता वसाहतीत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तिघांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ललिता विठ्ठल भंडारी (वय 40, रा. जनता वसाहत पर्वती, पुणे)  यांनी फिर्याद दिली असून गोपीनाथ विठ्ठल वाघ, ज्योतिबा वाघ आणि अनिल काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि गोपीनाथ वाघ हे पती-पत्नी आहेत. फिर्यादी ललिता भंडारी यांनी घर घेण्यासाठी रोख 75 हजार रुपये आणि काही सोन्याचे दागिने घरात ठेवले होते. हे दागिने आणि रोख रक्कम घरात न सापडल्याने गोपीनाथ वाघ याने चोरल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले.

फिर्यादी यांनी गोपीनाथ वाघ याला फोन करून घरातील रोख रक्कम आणि दागिने कुठे गेले असे विचारले असता त्याने दागिने मी चोरून नेले आहे तुला काय करायचे ते कर असे सांगितले. तर इतर दोन आरोपींनी फिर्यादी यांना पोलीस आयुक्तांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याचे भासवून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.