Sangvi News : बांधकाम साइटवरून साडेतीन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील निखिल कोळसे पाटील अँड आर जे लाहोटी नावाने सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साइटवरून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 60 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आली.

मंगेश मनोहर हरेकर (वय 39, रा. धायरी, पुणे) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स कन्स्ट्रक्शन या कंपनीची पिंपळे गुरव येथे एक बांधकाम साईट सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी सहा ते बुधवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी या बांधकाम साइटवरील रूमचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

बांधकाम साइटवरून सात कमोड टॉयलेट, चार युरीन भांडे, सात वॉश बेसिन, 23 नळ असे एकूण तीन लाख 60 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.