Pimpri : संस्कार ग्रुपच्या वैकुंठ कुंभारसह तिघांना अटक

आर्थिक गुन्हे शाखेची इंदौरमध्ये कारवाई

एमपीसी न्यूज – दाम दुप्पट तसेच ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून 10 हजार गुंतवणूकदारांची 100 कोटींहून अधिक रकमेची संस्कार ग्रुपकडून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल तीन वर्ष फरार असलेल्या वैकुंठ कुंभार, त्याची पत्नी राणी कुंभार आणि मेहूणा रामदास बबन शिवले या तिघांना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली. तर यापूर्वी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

ज्यादा व्याज तसेच दामदुप्पट योजनेच्या नावाखाली संस्कार ग्रुपच्या माध्यमातून वैकुंठ कुंभार, राणी कुंभार, रामदास शिवले यांच्यासह 17 जणांनी 10 हजार गुंतवणूकदारांची तब्बल 100 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीने आपल्या कुटूंबीय आणि नातेवाईकांसह शहरातून पळ काढला होता. तीन वर्षानंतरही आरोपी हाती लागत नसल्याने गुंतवणूकदारांनी माजी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या मागावर होते. तर अजय लेले, शिवाजी ढमढेरे व कमल शेळके यांना यापूर्वीच अटक झालेली आहे.

अशी होती साखळी

गुंतवणूकदारांपैकी अनेकांना एजंट म्हणून तयार करण्यात आले होते. त्यांनी आपल्यालाही 18 ते 24 टक्‍के व्याज मिळत असे, इतरांना सांगत गुंतवणूक करण्यास भाग पाडत असे. त्यातून एजंटांना आर्थिक मोबदलाही मिळला होता. जादा व्याज मिळत असल्याने अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी संस्कार ग्रुपमध्ये गुंतविली होती.

अन्‌ गुंतवणूकदारांचा उद्रेक झाला मुदत संपुष्टात आल्यावर अनेकांनी पैसे परत घेण्यासाठी संस्कारच्या कार्यालयाशी संपर्क केला. मात्र उद्या देतो, नंतर देतो असे सांगून गुंतवणूकदारांची बोळवण करण्यात येत होती. अखेर गुंतवणूकदारांचा संयम सुटला आणि त्यांनी संस्कारच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर वैकुंठ कुंभार याने आपल्या कुटूंबीय व नातेवाईकांसह शहरातून पळ काढला. त्यानंतर आरोपी मध्यप्रदेशातील इंदौर येथे असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते.

तो पळून जाण्याच्या तयारीत होता. वैकुंठ कुंभार याच्या इंदौरमधील घरापर्यंत पोलीस पोचले. मात्र, याची कुणकूण लागल्याने तो पत्नीस सोबत घेऊन मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेला. मात्र, तो शाळेच्या आवारातून बाहेर पडताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पौळ, सहाय्यक निरीक्षक महेंद्र कदम, सागर काटे, प्रशांत महाले, उपनिरीक्षक शरद आहेर, वसंत मुळे कर्मचारी बाळासाहेब दौंडकर, संजय पवार, शकुर तांबोळी, बाळासाहेब सुर्यवंशी, सुनील गवारी, रेणुका वाव्हळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.