Talegaon : विनापरवाना गोमांस घेऊन जाणा-या तिघांना अटक;

सव्वा नऊ लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – विनापरवाना गाय व बैलाचे कापलेले मांस कर्नाटक येथून मुंबईकडे घेऊन जाणा-या तिघांना तळेगाव दाभाडे पोलीस अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचे गोमांस आणि टेम्पो असा एकूण नऊ लाख 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 21) पहाटे तीन वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्यावर करण्यात आली.

आनंद बसवराज दुधगी (वय 30), हाजी अमीन कुरेशी (वय 20), साजीद बाबा कुरेशी (वय 34, तिघे रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक नवनाथ बाळासाहेब धायगुडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंश कापणे, वाहतूक करणे, विक्री करणे यासाठी बंदी आहे. पशु संवर्धन विभागाकडून यासाठी विशेष परवाना दिला जातो. परवाना न घेता आरोपींनी कर्नाटक राज्यातील इंडी येथून मुंबईमधील साजिद बाबा कुरेशी याला विकण्यासाठी टेम्पोमधून (एम एच 13 / ए एक्स 4571) घेऊन जात होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना उर्से टोलनाक्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 20 हजारांचे जनावरांचे मांस आणि टेम्पो असा एकूण नऊ लाख 20 हजारांचा ऐवज जप्त केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.