Pune : बिबट्यांच्या पिल्लांच्या तस्करी प्रकरणी तिघांना अटक; दोन जिवंत पिल्लांची सुटका

एमपीसी न्यूज – तस्करीच्या उद्देशाने बिबट्याच्या पिल्लांची वाहतूक प्रकरणी खेड –शिवापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई आज सोमवारी (दि.20) सकाळी दहाच्या सुमारास खेड-शिवापूर टोलनाका येथे पुणे सातारा रोडवर केली.

मुन्ना हबीब सय्यद (वय 31, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, पुणे), इरफाझ मेहमुद शेख, (वय,33 रा. कोंढवा), आयाज बक्शुलखान पठाण (वय 40, घोरपडी पेठ, पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर टोलनाका येथे वाहतूक नियमनाचे कामकाज सुरू असताना MH-12RF-1000 या क्रमांकाची कार सातारावरून पुण्याच्या दिशेने येत होती. यावेळी कारचालकाला लायसन्स मागितले यावेळी कारमधून एखाद्या वन्य प्राण्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. यावरून संशय येऊन कारची तपासणी केली असता प्लास्टिकच्या बास्केटमध्ये चार महिन्यांची बिबट्याची पिल्ले आढळून आली. त्यांना ताब्यात घेऊन आरोपींची चौकशी करण्यात आली.

यावेळी वन्यजीवांची कोठेतरी शिकार करून पिल्लांना तस्करीच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याचे समोर आले.खेड शिवापूर पोलिसांनी आरोपींना अटक करून बिबट्यांच्या पिल्लांची सोडवणूक केली. आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्याअनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.