Dehuroad : तरुणावर तलवारीने खुनी हल्ला करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून एका तरुणावर खुनी हल्ला केला. हल्ला करणा-या चौघांना पोलिसांनी आकुर्डी येथून ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असून अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

रोहित दीपक ओव्हाळ (वय 18), डॅनी उर्फ रॉनी मनोज फाजगे (वय 24, दोघे रा. आकुर्डी), आदित्य श्रीमंत कोटगी (वय 21, रा. बावधन) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रशांत कैलास भालेराव (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (दि. 5) दुपारी साडेचारच्या सुमारास विकासनगर, देहूरोड येथे घडली. गुरुवारी दुपारी जखमी प्रशांत त्यांचे मित्र संतोष साबळे, शुभम जाधव यांच्यासोबत शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दुपारी दर्शन झाल्यानंतर तिघेही देहूरोड मधील विकासनगर येथे झिंगाट मिसळ या हॉटेलवर जेवणासाठी थांबले. त्यावेळी चार आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रशांत यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. यामध्ये प्रशांत यांच्या हाताला, डोक्याला, पायाला व कमरेवर गंभीर दुखापत झाली.

निगडी पोलिसांनी आकुर्डी येथून चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यातील तिघांना अटक करून आरोपींना देहूरोड पोलिसांकडे देण्यात आले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.