BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – महावितरणचे कर्मचारी वाटावे म्हणून खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाकड परिसरातील साडेतीन लाखांचे चार ट्रान्सफॉर्मर हस्तगत केले आहेत.

सुनिल रघुनाथ कदम (वय 48, रा. घोटवी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), जाबीर अब्दुल शेख (वय 32, रा. जयमल्हार कॉलनी, थेरगाव), हनुमंत सुर्यकांत माने (वय 43, रा. पिपंरी वाघेरे कॉलनी क्र 2, पिपंरीगाव), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ते 26 ऑक्‍टोबर दरम्यान आनंदवन सोसायटी, थेरगाव आणि चैतन्य विहार सोसायटी, बोट क्‍लब, थेरगाव याठिकाणी महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीचे (एमएसईबी) एक लाख 80 हजारांचे दोन ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले. तसेच 4 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत ज्ञानदा कॉलनी, वाकड येथील एक लाख 80 हजारांचे आणखी दोन ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले होते. याबाबत एमएसईबीच्यावतीने सहायक अभियंता सनी टोपे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वाकड पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. तपासात परिसरातील सीसीटिव्हीचे फुटेज तपासले असता खाकी कपडे घातलेले आरोपी दिसून आले.

आरोपींबाबत खबऱ्यांना माहिती दिली असता खाकी कपडे घालून सदर ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर साथीदारांच्या मदतीने घेऊन गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एकजण संशयितरित्या खाकी शर्ट व पॅन्ट घालून वाकड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यास विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तीनही आरोपींना अटक करीत त्यांच्याकडील तीन लाख 60 हजार रुपयांचे तीन ट्रान्सफॉर्मर हस्तगत केले.

आरोपी सुनील कदम हा दोन वर्षांपूर्वी श्रीगोंदा येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्याच्या दुकानात कामाला होता. त्याला ट्रान्सफॉर्मरची माहिती होती. ट्रान्सफॉर्मर चोरी करून विकल्यास चांगले पैसे मिळत असल्याचे त्याला माहिती होते. त्यामुळे त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ट्रान्सफॉर्मर चोरीचा प्लॅन केला. कुणाला शंका येऊ नये म्हणून चोरी करण्याच्या ठिकाणची माहिती घेतली जायची. त्यानंतर महावितरण कर्मचा-याप्रमाणे खाकी कपडे कपडे घालून जवळच्या क्रेन शॉपमध्ये जाऊन बनावट पत्र दाखवून दुरुस्तीसाठी ट्रान्सफॉर्मर काढायचा असल्याचे सांगितले जायचे. क्रेनच्या साहाय्याने चोरटे ट्रान्सफॉर्मर खाली उतरवून चोरी करीत असत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like