Bhosari Crime News: दुकान खाली करण्यासाठी दुकानदार, कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज – दुकान खाली करण्याची धमकी देऊन दुकानदाराला व कामगाराला मारहाण केली. मोशी येथील गोडाऊन चौकातील पंचम स्वीट दुकानामध्ये शनिवारी (दि. 16) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

गणेश ढगलाराजमजी प्रजापती (वय 29, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रामलाल रुपारामजी चौधरी (वय 58), प्रवीण रामलाल चौधरी (वय 28, दोघेही रा. संतनगर, मोशी ), यांच्यासह तीन महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी रामलाल चौधरी व प्रवीण चौधरी यांच्यासह एका महिलेला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रजापती यांचे मोशी येथील गोडाऊन चौकात पंचम स्वीट नावाचे दुकान आहे. आरोपींनी फिर्यादीला दुकान खाली करण्याची धमकी दिली. फिर्यादीने दुकान खाली न केल्याने आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या दुकानामध्ये घुसून मोठमोठ्याने आरडाओरडा करून फिर्यादी व त्यांच्या कामगारांना शिवीगाळ केली.

दरम्यान, फिर्यादी व त्यांचा कामगार कृष्ण गोपाल शर्मा यांना लोखंडी खुरपे, लोखंडी चमचा व लाकडी बांबूने आरोपींनी मारहाण करत फिर्यादी व त्यांच्या कामगारांना दुकानातून बाहेर काढले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.