Pimpri Crime News : ‘पोलीस आयुक्ताला सुद्धा सोडले नाही, तर तू काय चीज आहे’ असे म्हणत महिलेला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज –  ‘माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत, मी पोलीस आयुक्ताला सुद्धा सोडले नाही तर तू काय चीज आहे’ असे म्हणत एकाने महिलेला संपवून टाकण्याची धमकी दिली. तसेच 15 जणांच्या टोळक्याने महिलेला शिवीगाळ करत त्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम बंद पाडले. ही घटना एप्रिल 2020 ते 12 सप्टेंबर 2021 या कालावधीत पिंपरी येथे घडली.

दिलीप रामभाऊ गायकवाड (वय अंदाजे 45), गणेश गायकवाड (वय अंदाजे 32), संकेत गायकवाड (वय अंदाजे 25), सचिन गायकवाड (वय अंदाजे 30), अमित बुरुटे (वय अंदाजे 23), ऋषिकेश उर्फ गांग्या (वय अंदाजे 23), किरण रणपिसे (वय अंदाजे 30), दीपक कांबळे (वय 35), चार महिला आणि दोन ते तीन अनोळखीचे साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी 51 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 20) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात कट रचून फिर्यादी यांच्या बंगल्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपी दिलीप गायकवाड यांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून येत अश्लील शिवीगाळ केली. त्याने फिर्यादी यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम दहशतीने थांबवण्यास भाग पाडले.

फिर्यादी यांच्या मुलाला गायब करून जीवे मारण्याची धमकी देत दीपक कांबळे याने फिर्यादी यांना ‘माझ्या सर्व ठिकाणी वरपर्यंत ओळखी आहेत, मी पोलीस आयुक्ताला सुद्धा सोडले नाही तर तू काय चीज आहे. तुला संपवून टाकेल’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.