Velha : Pune : गाडीतून सव्वालाखाचा लॅपटॉप चोरी प्रकरणात तीघांना अटक; अवघ्या पाच तासात गुन्ह्याचा छडा

एमपीसी न्यूज – अक्सिडेंट झालेल्या इरटीगा गाडीतून गर्दीचा फायदा घेत गाडीतील सव्वालाख रुपये किमतीच्या लॅपटॉप व इतर साहित्य चोरी प्रकरणातील तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांनी अवघ्या पाच तासात गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.

विठ्ठल बजरंग शेंडकर, दिगंबर लक्ष्मण ननवरे, वसंत सोपान राजीवडे, (रा. वेल्हा), अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शिखर गुप्ता यांनी वेल्हे पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुप्ता हे त्यांच्या मित्रांसह कोदवडी गावी मंत्री रिसॉर्ट येथे ओला कॅबने इरटिगा गाडी बुक करून फिरण्यासाठी आले होते. यावेळी रिसॉर्टमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी त्यांचे लॅपटॉप, चार्जर, माऊस, जेबीएल कंपनीचा साउंड एक जरकीन एवढे साहित्य गाडीत ठेवले होते. त्यांना येण्यासाठी वेळ असल्याने चालक लोंढे हा गाडी घेऊन बाहेर गेला होता. पुन्हा मंत्रा रिसॉर्टकडे जात असताना लोखंडी पुलाजवळ अचानक गाडी आल्याने तिला वाचवण्याच्या नादात लोंढे यांची गाडी रोडच्या उजव्या बाजूला खाली जाऊन एका झाडाला धडकली.

गाडीला अपघात झाल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने गाडी वर काढत असताना तिथे गर्दी जमली झाली होती. या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी गाडीतील सव्वालाखांचे लॅपटॉप व इतर साहित्य चोरून नेले. गुप्ता यांनी याप्रकरणी वेल्हे पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवत अवघ्या पाच तासात अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, माऊस व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

वेल्हे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.