Chakan : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या टोळीतील तिघांना अटक

एमपीसी न्यूज – चाकण तळेगाव रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर छापा मारून त्यातील तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 90 हजार 100 रुपये किमतीचे दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी आज (रविवारी) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास केली.

पियुष शंकर धाडगे (वय 19, रा. धाडगे मळा, चाकण, ता. खेड), मेहबूब नबीसाहब शेख (वय 21, रा. आंबेठाण चौक, चाकण, ता. खेड), विनोद अर्जुन अनारसे (वय 19, रा. निघोजे डोंगर वस्ती, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल बनसोडे (रा. निघोजे, ता. खेड) हा आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथील चाकण तळेगाव रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर काही तरुण दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. अशी  माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तरुणांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दरम्यान एक आरोपी पळून गेला. पकडण्यात आलेल्यांकडून मिरची पूड, लोखंडी कोयता, चोरीचे तीन मोबाईल फोन, तीन मोटारसायकल असा एकूण 1 लाख 90 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला. तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी मागील सहा महिन्यात चाकण एमआयडीसी परिसरात ट्रक चालकांना अडवून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन जबरदस्तीने चोरल्याचे 20 ते 25 प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडे मिळालेले मोबाईल आणि दुचाकी चोरीची असून मूळ मालकांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे, पोलीस नाईक कांबळे, जाधव, जरे, सातकर, गोरड, गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल वर्पे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.