Pune News : स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात महिलेला मारहाण करणाऱ्या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व येथील कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालगंधर्व सभाग्रहात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला होता. 

भस्मराज तिकोने, प्रमोद कोंढरे आणि मयुर गांधी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वैशाली बाळासाहेब नागवडे (वय 47) यांनी तक्रार दिली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अमित शहा आणि भाजपाची वाटचाल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी बालगंधर्व सभागृहात उपस्थित होत्या. यावेळी त्यांना घरगुती गॅसच्या वाढत्या किमती आणि महागाईबाबत निवेदन देण्यासाठी फिर्यादी महिला आणि त्यांच्या सहकारी बालगंधर्व सभाग्रहात गेल्या होत्या.

यावेळी झालेल्या गोंधळात आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या सहकारी महिलांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करून धमकी दिली. तर फिर्यादी यांच्या साडीचा पदर उडून त्यांच्याकडे बघून अश्लील हातवारे करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे प्रकार केले. वैशाली नागवडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.