Pune Crime News : चारचाकीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एकाचा खून

एमपीसी न्यूज – चारचाकी गाडीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत दुचाकास्वाराचा मृत्यू झाला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बगाडे वस्ती येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला.

या घटनेत अक्षय अंकुश तळेकर (वय 21) या तरुणाचा खून झाला आहे. त्याप्रकरणी त्याचा भाऊ अमर टिळेकर (वय 24) यांनी फिर्याद दिली असून तिघांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास अक्षयला तिघेजण बेदम मारहाण करत असल्याची माहिती अमर टिळेकर त्यांना मिळाली होती. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्या ठिकाणी काही लोक जमा झाले होते. अमर आणि त्याचा नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यानंतर मारणारे तिघेही कारमध्ये बसून निघून गेले. अमरने त्याच्या कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी वेगात असल्याने त्यांनी थांबवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.

दरम्यान, अमरने या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांना विचारले असता दुचाकीचा चारचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून अक्षयला बेदम मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले. अक्षयला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.