Maharashtra News: ऐन दिवाळीत तीन सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

एमपीसी न्यूज : जालना जिल्ह्यातून एक काळजाचा ठोका चुकवणारा  प्रकार समोर आलाय. विजेच्या धक्क्याने तीन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झालाय.  जालना जिल्ह्यातील पिंपळगाव पिंगळी या गावात ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 

ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (वय 27), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (वय 24) आणि सुनील आप्पासाहेब जाधव असे मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. ऐन दिवाळीत या भावंडांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

हे तिघे भाऊ बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. शेतात गेल्यानंतर एकाने विहिरीवरील विद्युतपंप सुरू केला असता विजेचा झटका लागल्याने तो विहिरीत कोसळला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोघांनी विहिरीत उड्या मारल्या परंतु विहिरीत ही विद्युत प्रवाह उतरल्याने तिघांचाही मृत्यू झाला.

रात्री उशिरापर्यंत मुले घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. रात्री एकच्या सुमारास नातेवाइकांनी शेतात पाहणी केली असता विहिरीत तिघांचेही मृतदेह निदर्शनास आले. मृत्युमुखी पडलेल्या पैकी ज्ञानेश्वर जाधव यांचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. तीन कर्त्या मुलांच्या मृत्यूने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.