Bhosari Crime News : भोसरी, हिंजवडी, तळेगावात तीन घरफोड्या; साडेसात लाखांचा मुद्देमाल लंपास

एमपीसी न्यूज – भोसरी, हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे येथे घरफोडीचे तीन प्रकार उघडकीस आले आहेत. यात अज्ञात चोरट्यांनी सात लाख 61 हजार 475 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत शनिवारी (दि. 11) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरफोडीचा पहिला प्रकार भोसरी परिसरात उघडकीस आला. यामध्ये 38 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते दहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडला. फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

कपाटात ठेवलेली रोख रक्कम, म्युझिक सिस्टम, भांडी व विक्री करता आणलेले नवीन कपडे असा एकूण 39 हजार 175 रुपये किमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

घरफोडीचा दुसरा प्रकार हिंजवडी येथे तीन सप्टेंबर रोजी रात्री 7 ते 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या कालावधीत माण रोड, मुळशी येथे घडला. अहमद अब्दुल रज्जाक कच्छी (वय 59, रा. हिंजवडी फेज तीन, माण रोड, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने, युएस डॉलर्स व रोख रक्कम असा एकूण सहा लाख 90 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

घरफोडीचा तिसरा प्रकार तळेगाव दाभाडे येथील तेली आळी येथे उघडकीस आला. हा प्रकार 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा ते सकाळी दहा वाजताच्या कालावधीत घडला. या प्रकरणी 22 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरात दरवाजावाटे प्रवेश करून घरातून एक लॅपटॉप, एक हार्डडिस्क, एक कॅलक्युलेटर, आय कार्ड व पुस्तके असा एकूण 32 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.