Dighi News : पादचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या तिघांवर एकाच दिवशी जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तीन चोरट्यांवर जबरी चोरीचे एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या चोरट्यांना दिघी पोलिसांनी एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

श्रीकांत अंबादास वाघमोडे (वय 19, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली), श्रेयस मोरेश्वर शेळके (वय 19, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली), ओमकार गंगाधर गायकवाड (वय 20, रा. साने चौक, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पहिल्या प्रकरणात नाना उर्फ आश्रुबा मल्लप्पा साळुंखे (वय 45, रा. शेलारवस्ती, चिखली) यांनी बुधवारी (दि. 28) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी साळुंखे 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता शेलारवस्ती, देहू आळंदी रोड, चिखली येथून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.

दुसऱ्या प्रकरणात अनिल अर्जुन बनसोडे (वय 26, रा. भिमशक्तीनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बनसोडे 28 मे रोजी सकाळी नऊ वाजता साने चौक, चिखली येथून रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या हातातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना चिखली परिसरात घडली असल्याने हा गुन्हा दिघी पोलिसांनी चिखली पोलिसांकडे वर्ग केला आहे.

तिसर्‍या प्रकरणात शंकर शिवाजी तेलगावे (वय 26, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अकरा एप्रिल रोजी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास इंद्रायणीनगर येथील रस्त्याने सायकलवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या सायकलला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या खिशातून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना देखील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हा गुन्हा चिखली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

दिघी पोलिसांनी या तिन्ही चोरट्यांना एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यानंतर त्यांनी जबरी चोरीचे आणखी तीन गुन्हे केल्याचे कबूल केल्याने हे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.