Chakan News : पाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या अॅमेनिटी स्पेसमध्ये बांधण्यात येणार्‍या इमारतीत जिम्नॅशियम हॉल बारा लाख 70 हजार रुपयांना विकण्याचे ठरवून त्यासाठी खरेदी खताच्या अगोदर पाच लाख रुपये घेतले. खरेदीखतानुसार 18 महिन्यांच्या आत बांधकाम करून जिम्नॅशियम हाॅलचा ताबा देण्याचे कबूल केले.

मात्र दिलेल्या मुदतीत जिम्नॅशियम हाॅलचा ताबा न देता पाच लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ऑक्टोबर 2011 ते 12 मे 2015 या कालावधीत पावनधाम सोसायटी, चाकण येथे घडला.

सागर प्रवीणभाई पटेल (रा. मोशी प्राधिकरण, मोशी), निलेश शिवलाल पटेल (रा. फातिमानगर, पुणे), हितेश पटेल (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शांताराम दशरथ वाकोडे (वय 42, रा. श्रीरामनगर, शिक्रापूर रोड, चाकण) यांनी बुधवारी (दि. 23) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण मधील पावनधाम सोसायटीच्या अॅमेनिटी स्पेस मध्ये बांधण्यात येणाऱ्या इमारतीत पहिल्या मजल्यावर 38.270 चौरस मीटर कार्पेट आकाराचा जिम्नॅशियम हॉल 12 लाख 70 हजार रुपयांना फिर्यादी यांना देण्याचे आरोपींनी 15 ऑक्टोबर 2011 रोजी सांगितले. तसा प्रथम तोंडी व्यवहार देखील ठरवला.

त्यानंतर सोसायटीचा प्लॅन रिव्यू करून झाल्यावर 12 मे 2015 रोजी खरेदीखत करून जिम्नॅशियम हॉल फिर्यादी यांना विकला. त्याबाबत फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी चेक आणि आरटीजीएस द्वारे कंपनीच्या खात्यावर पाच लाख रुपये एवढी रक्कम घेतली. खरेदी खतामध्ये स्टॅम्प ड्युटी जास्त लागेल असे सांगून खरेदी खतामध्ये चेकने केवळ दोन लाख रुपये मिळाल्याचा उल्लेख केला. आरटीजीएस द्वारे घेतलेल्या तीन लाख रुपयांचा आरोपींनी उल्लेख केला नाही.

त्या खरेदीखतानुसार 18 महिन्यांच्या आत बांधकाम करून फिर्यादींना जिम्नॅशियम हाॅलचा ताबा देण्याचे कबूल करण्यात आले. मात्र आरोपींनी अद्याप बांधकाम सुरू न करता फिर्यादी यांची पाच लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.