Dighi : जावयाला मदत करणं पडलं महागात; जमिनीच्या व्यवहारात सव्वातीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – जावयाला 27 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज झाले. त्याने सासरच्या मंडळींकडे मदत मागितली. जावयाला मदत करण्यासाठी सास-यांनी जमीन विक्रीस काढली. जमिनीचा व्यवहार करत असताना सुरुवातीला जमीन खरेदी करताना 1 कोटी 51 लाख 76 हजार रुपयांचे चेक खरेदी करणा-याने सही न करता दिले. आपली फसवणूक होईल तसेच व्यवहार चोख नसल्याने जमीन विक्रेत्याने जमीन विकणे रद्द केले. स्वतःची विकलेली जमीन पुन्हा स्वतःच्या नावावर करताना पुन्हा 1 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार 31 ऑगस्ट 2016 पासून 6 ऑगस्ट 2018 दरम्यान पराठेमळा, च-होली येथे घडला.

अनिता सदाशिव पठारे (वय 47, रा. पठारेमळा, च-होली बुद्रुक, ता. हवेली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश तुकाराम खांदवे (वय 43, रा. लोहगाव, पुणे) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता पठारे यांचे जावई नवनाथ नंदकुमार आव्हाळे (वय 34, रा. आव्हाळवाडी, पुणे) यांनी सुरेश खांदवे यांच्याकडून 27 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज घेतले. नवनाथ सुरेश यांना ते कर्ज परत करू शकले नाहीत. त्यामुळे सुरेश यांनी नवनाथ यांचे सासरे सदाशिव पठारे यांची च-होली येथील जमीन विकत घेण्याबाबत सांगितले. त्यावेळी नवनाथ यांनी सासरे सदाशिव यांना मदत म्हणून पैसे मागितले. सदाशिव यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने त्यांनी त्यांच्या मालकीची  40.25 आर जमीन विक्रीस काढली.

नवनाथ यांनी त्याचा मित्र संदीप उर्फ पंकज राजाराम आव्हाळे (वय 38, रा. आव्हाळवाडी, वाघोली) यांच्यामार्फत सुरेश यांना जमीन घ्यायचे असल्याचे सांगितले. चर्चेनंतर ही जमीन 2 कोटी 21 लाख 76 हजार रुपयांना खरेदी करण्याचे ठरले. सुरेश यांनी सदाशिव यांना वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून 80 लाख रुपये दिले. उर्वरित 1 कोटी 41 लाख रुपये रकमेचे धनादेश सही न करता दिले. वारंवार पाठपुरावा करून सुरेश यांनी उर्वरित रक्कम दिली नाही.

व्यवहारामध्ये चोखपणा नसल्यामुळे तसेच आपली फसवणूक होऊ शकेल; या भीतीने सदाशिव यांनी विकलेली जमीन परत आपल्या नावावर करून देण्याची मागणी केली. त्यासाठी सुरेश यांनी दिलेल्या रक्कम आणि आणखी काही रक्कम देऊन व्यवहार करण्याचे ठरले. तडजोडीअंती 1 कोटी 80 लाख रुपयांना जमीन पुन्हा फिरवण्याचे ठरले. जमीन असताना सदाशिव यांनी ठरलेल्या रकमेपैकी 20 लाख रुपयांचा बँकेचा डीडी सुरेश यांना दिला. मात्र, खरेदीखतावेळी सुरेश यांनी डीडी खात्यावर जमा झाल्याशिवाय सही करणार नसल्याची भूमिका घेतली. दुस-या दिवशी डीडी ची रक्कम सुरेश यांच्या खात्यावर जमा झाली. तरीही सुरेश यांनी खरेदीखत केले नाही.

काही दिवसांनी सदाशिव यांना समजले की, त्यांचा जावई नवनाथ याने सुरेश यांच्याकडून कर्ज घेतले. त्या कर्जाची रक्कम त्याने या व्यवहारातून फिरवली आहे. मात्र, जावयाला लाखोंची मदत करण्याच्या नादात सासरा मात्र कोट्यवधींना फसला. सुरेश यांनी एकूण 3 कोटी 31 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.