Chinchwad News : शहरात घरफोडीच्या तीन घटना; सहा लाख 36 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – शहरात घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. चोरट्यांनी दोन लॅपटॉप तसेच दागिने, रोकड, असा सहा लाख 36 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी हिंजवडीत दोन तर सांगवी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनीत कुमार मल्ल (वय 25, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) यांनी सोमवारी (दि. 11) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची खोली बंद असताना अज्ञात चोरट्याने बनावट चावीने लॉक खोलून खोलीत प्रवेश केला. खोलीतून फिर्यादीचा 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. रविवारी (दि. 10) रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान हा प्रकार घडला.

पुनम राजाभाऊ भिसे (वय 25, रा. जयराम नगर हिंजवडी, मूळ रा. भिसे वाघोली, जि. लातूर) यांनी सोमवारी (दि. 11) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मी व्यंकट मल्यालम (वय 23, रा. जयराम नगर, हिंजवडी), निकिता देशमुख (पूर्ण पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निकिता देशमुख व पीजी मालकीण लक्ष्मी यांनी संगणमताने रविवारी (दि. 10) फिर्यादीच्या खोलीतून 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

शिवशांत सुभाषराव जाधव (वय 34, रा. गणेश नगर, नवी सांगवी) यांनी मंगळवारी (दि. 12) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नेताजी नगर, पिंपळे गुरव येथे शुक्रवार (दि. 8) ते सोमवार (दि. 11) या कालावधीत घरफोडीचा हा प्रकार घडला. फिर्यादीचे मामा ओंकार भालकेश्वर यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 12 तोळे 4 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण पाच लाख 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.