Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड हादरले; शहरात चार दिवसात खुनाच्या तीन घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा एकदा हादरले आहे. मागील चार दिवसात तब्बल तीन खुनाच्या घटना घडल्या. निगडी, चाकण आणि भोसरी परिसरात हे प्रकार उघडकीस आले आहेत.

निगडी आणि चाकण येथे खून झाले असून भोसरी परिसरात एकाचा मृतदेह टेम्पोमध्ये आढळून आला आहे. तसेच एमआयडीसी भोसरी परिसरात सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचे अवशेष आढळून आले आहेत.

निगडी परिसरातील ओटास्कीम येथे 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोघेजण बोलत थांबलेले असताना एकजण दारू पिऊन आला. त्याने विनाकारण गप्पा मारत थांबलेल्या एका व्यक्तीच्या पोटात चाकूने भोकसले.  गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चाकण येथे 17 नोव्हेंबर रोजी रात्री तिघांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यात तरुणाच्या डोक्यात, तोंडावर, मानेवर, पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार वाटेकरवाडी – पवळेवाडी या गावांच्या शिवेवर 18 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. पूर्ववैमनस्यातून हा खून केला आहे.

तिसरा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला. एका तरुणाचा मृतदेह एका टेम्पोत 18 नोव्हेंबर रोजी दुपारी आढळला. मृतदेह आढळलेल्या तरुणाच्या शरीरावर खुणा असल्याने हा प्रकार देखील घातपाताचा असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

17 नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने बांधलेल्या बालाजीनगर येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचे अवशेष आढळून आले. कवटीसह अन्य हाडांचे अवशेष असल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. मृत्यूनंतर त्या व्यक्तीची कवटीसह हाडे एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून टाकण्यात आली होती.

या घटनांमुळे पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा शहारले आहे. वाहनचोरी, सोनसाखळी चोरी यांसारख्या घटना कमी होतात न होतात तोच खुनासारखे गंभीर प्रकार घडू लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.