Sangvi News : सांगवी, दिघी, तळेगावात चोरीच्या तीन घटना; अडीच लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – सांगवी येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दिघी येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा तीस हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला. तर तळेगाव दाभाडे येथे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मध्ये झोपलेल्या महिलेचे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी रविवारी (दि. 3) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अशोक सिताराम पाटील (वय 74, रा. कृष्णा चौक, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतील दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून बेडरुममध्ये प्रवेश केला. लाकडी वॉर्डरोबमधील एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

श्याम गोरोबा कातळे (वय 31, रा. आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी च-होली येथील दाभाडे चौकात भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. भाजी खरेदी करत असताना ते त्यांच्या मित्राला फोनवर बोलत होते. फोनवर बोलून झाल्यानंतर त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला आणि भाजी खरेदी करत होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचा 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे पती 30 सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून त्यांच्या कंटेनर मधून जात होते. उर्से गावाच्या हद्दीत फूड मॉलच्या समोर  फिर्यादी यांच्या पतीने कंटेनर थांबवला. कंटेनरमध्ये आराम करत असताना नजरचुकीने फिर्यादी यांच्याकडून कंटेनरचा दरवाजा उघडा राहिला. पहाटे तीन ते चार वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंटेनरच्या उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून फिर्यादी यांचे एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.