Nere News : नेरे गावात उसाच्या फडात सापडले बिबट्याचे तीन बछडे

एमपीसी न्यूज – मुळशी येथील नेरे गावात उसाच्या फडात आज (सोमवारी, दि.24) सकाळी बिबट्याचे तीन बछडे सापडले आहेत. एक नर आणि दोन मादी जातीचे हे बछडे आहेत. शेतकरी मोहन जाधव यांच्या उसाच्या फडात विठ्ठल पालवे या ऊसतोड कामगाराला हे बछडे आढळून आले. आई सोबत पुर्नमिलनासाठी त्यांना आहे त्याजागी पुन्हा ठेवण्यात आले आहे.

शेतकरी मोहन जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. जाधव यांनी तात्काळ वनविभागाला संपर्क साधला. वन अधिकारी व एनिमल रेस्क्यु टिम घटनास्थळी दाखल झाले व बछडे ताब्यात घेण्यात आले.

मानद वन्यजीव रक्षक, पुणे जिल्हा याचे आदित्य परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बछड्यांचे वय साधारण 15 ते 20 दिवस आहे. त्यांना ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली, सर्व बछडे सुदृढ व निरोगी आहेत. त्यांना मायक्रोचिप बसवून आहे त्या जागेवर सोडण्यात आले आहे. आज रात्री त्यांची आई त्यांना घेऊन जाण्याची शक्यता आहे. लांबून या घटनेचे निरिक्षण केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात बछडे आढळून आले त्यांचे देखील चांगले सहकार्य मिळत आहे. अलिकडे पुर्नेमिलनाचे प्रमाण वाढले आहे.’ असं परांजपे म्हणाले.

रेस्क्यु सीटी वाइल्डलाइफ, पुणेच्या संस्थापिका अध्यक्षा नेहा पंचमीया म्हणाल्या, ‘या बछड्यांना त्यांच्या आईच्या मायेची गरज आहे. त्यामुळे जेथे बछडे सापडले आहेत, त्याच ठिकाणी त्यांना पुन्हा सोडण्यात येणार आहे. त्यामुळे बिबट्या मादी त्या बछड्यांना घेऊन जाईल. त्या मादीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत. आज रात्री ती त्या जागेवर येईल आणि आई व बछड्यांचे पुर्नेमिलनाचे होण्याची शक्यता आहे.’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.