Hinjawadi : फेसबुक फ्रेंडने घातला तीन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणीने तिला भारतात नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्याची बतावणी करून व्यावसायिकाला तीन लाखांचा गंडा घातला. ही घटना 17 जुलै ते 7 सप्टेंबर 2019 या कालावधीत हिंजवडी येथील आयटी कंपनीत घडली.

अमित साहू (वय 39, रा.हिंजवडी फेज 2), अशी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहू हे व्यावसायिक असून त्यांची जुलै 2019 मध्ये फेसबुकवर जस्मिन इथन या नावाने बनावट आयडी असणाऱ्या भामट्याशी ओळख झाली. जस्मिन हिने साहू यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच भारतात त्यांना रियल इस्टेटचा नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्याचे सांगत त्याद्वारे साहू यांना फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. लंडनच्या एसटीडी कोड असणाऱ्या क्रमांकावरून त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्याकडे असणारे विदेशी चलन हे भारतीय चलनात वळवण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार साहू यांनी वेळोवेळी 2 लाख 89 हजार रुपये आरोपींच्या खात्यात भरले. मात्र त्यानंतर पाठपुरावा केला असता फसवणूक झाल्याचे साहू यांच्या लक्षात आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.