Hinjawadi News : तीन प्रवाशांनी हत्यारांचा धाक दाखवून टेम्पो चालकाला लुटले

तिघांना अटक

एमपीसी न्यूज – टेम्पोमध्ये बसवलेल्या तीन प्रवाशांनी टेम्पो चालकाला कोयता आणि चाकू अशा शस्त्रांचा धाक दाखवून लुटले. टेम्पो चालकाकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. ही घटना सोमवारी (दि. 6) पहाटे मुंबई-पुणे महामार्गावर पुनावळे अंडरपास ब्रिजवर घडली.

युवराज लेसु राठोड (वय 28, रा. कृष्णानगर, उंब्रज, ता. कराड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव गणेश लबडे (वय 28), सागर संजय अडागळे (वय 23), दिनेश सुमंतराव गोगावले (वय 34, रा. हडपसर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चालक आहेत. ते त्यांच्या आयशर टेम्पोमधून कोल्हापूर ते मुंबई माल घेऊन जात होते. सोमवारी पहाटे तीन तरुणांनी मुंबईकडे जाण्याच्या बहाण्याने हात करून फिर्यादी यांच्या टेम्पोला थांबवले. फिर्यादी यांनी तिघा तरुणांना प्रवासी म्हणून घेतले. पुनावळे अंडरपास ब्रिजवर आल्यानंतर तिघा प्रवासी तरुणांनी फिर्यादी यांना कोयता आणि चाकूचा धाक दाखवला. जबरदस्तीने फिर्यादीकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण चार हजार 100 रुपयांचा ऐवज काढून घेतला.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.